आजकाल चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत सगळीकडे UPI पेमेंट सुरू आहे. फोन काढा, स्कॅन करा, आणि पेमेंट करा, इतकं सोपं झालंय सगळं. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की रोज इतक्या वेळा UPI वापरल्याने आपला CIBIL स्कोअर तर खराब होत नाही ना? चला तर मग आज हे एकदा नीट समजून घेऊया.
UPI व्यवहारांचा CIBIL स्कोअरशी थेट संबंध नाही
CIBIL स्कोअर म्हणजे तुमच्या कर्ज घेण्याच्या आणि परत करण्याच्या सवयींवर आधारित एक गुण. बँका, NBFC किंवा क्रेडिट कार्ड कंपन्यांनी दिलेल्या कर्जाची माहिती क्रेडिट रिपोर्टमध्ये नोंदवली जाते.
आता UPI म्हणजे काय?
UPI म्हणजे तुमच्या बँक खात्यातून थेट दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवणे. यात कुठलेही कर्ज नाही, व्याज नाही, क्रेडिट लिमिट नाही. म्हणूनच UPI व्यवहार कधीच क्रेडिट रिपोर्टमध्ये नोंदवले जात नाहीत. तुम्ही दिवसातून दहा वेळा UPI वापरला काय किंवा एकदाही नाही वापरला काय, केवळ त्यामुळे CIBIL स्कोअरमध्ये कसलाही फरक पडत नाही.
बँका फक्त CIBIL नव्हे तर आर्थिक शिस्तही तपासतात
हे खरं आहे की UPI चा थेट परिणाम CIBIL वर होत नाही. पण कर्ज मंजूर करताना बँका फक्त स्कोअर बघून थांबत नाहीत. त्या तुमच्या खात्याचे एकूण चित्र पाहतात.
उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यात नेहमी कमी शिल्लक असेल, खर्च खूप अनियमित असेल आणि बचत जवळपास शून्य असेल, तर बँकेला तुमची आर्थिक स्थिती कमकुवत वाटू शकते. या परिस्थितीत UPI स्कोअर बदलत नसला, तरी तुमच्या खर्चाच्या सवयी कर्ज मिळण्यावर अप्रत्यक्ष परिणाम करू शकतात.
क्रेडिट कार्ड UPI ला जोडलेले असेल तर?
हा मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही RuPay credit card किंवा इतर कोणतेही क्रेडिट कार्ड UPI शी link केले असेल, तर त्या माध्यमातून झालेले सर्व व्यवहार त्या कार्डाच्या बिलात जमा होतात, अशावेळी….
- बिल वेळेत आणि पूर्ण भरले तर credit score सुधारतो.
- बिल भरायला उशीर झाला तर credit score खाली येतो.
- credit limit च्या ८०% पेक्षा जास्त वापर केला तर credit utilization ratio वाढून स्कोअरवर नकारात्मक परिणाम
म्हणजे इथे UPI चा प्रश्नच नाही, तर तुम्ही credit card कसे वापरता, हे महत्त्वाचे आहे.
भविष्यात UPI डेटा महत्त्वाचा ठरू शकतो
सध्या अनेक fintech कंपन्या आणि नवीन पिढीच्या बँका UPI व्यवहारांच्या आधारे ग्राहकांचे आर्थिक वर्तन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः ज्यांची अजून कुठलीही credit history नाही, त्यांच्यासाठी UPI डेटा भविष्यात कर्ज मंजुरीत उपयोगी ठरू शकतो. पण हे अजून प्रायोगिक अवस्थेत आहे — सध्या तरी CIBIL स्कोअरशी याचा थेट संबंध नाही.
थोडक्यात सांगायचं तर UPI जास्त वापरल्याने CIBIL स्कोअर खराब होत नाही. पण खर्चावर नियंत्रण नसेल, खात्यात नेहमी तुटवडा असेल किंवा क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरत नसाल — तर मात्र आर्थिक आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो.
UPI वापरा निर्धास्तपणे. फक्त खर्चावर लक्ष ठेवा आणि credit card असेल तर ते जबाबदारीने वापरा.
FAQ
- प्र. UPI payments CIBIL report मध्ये दिसतात का?
- उ. नाही. UPI व्यवहार credit bureau ला कळवले जात नाहीत, त्यामुळे ते CIBIL report मध्ये कधीच दिसत नाहीत.
- प्र. PhonePe किंवा Google Pay जास्त वापरल्याने स्कोअर कमी होतो का?
- उ. नाही. या apps फक्त UPI माध्यम आहेत. यांचा credit score शी काहीही संबंध नाही.
- प्र. RuPay credit card UPI ला link केल्यावर काय होतं?
- उ. त्या कार्डाद्वारे केलेले सर्व UPI व्यवहार credit card बिलात जातात. बिल वेळेवर भरल्यास score सुधारतो, उशीर केल्यास कमी होतो.
- प्र. चांगला CIBIL score ठेवण्यासाठी काय करावं?
- उ. EMI वेळेवर भरा, credit card चे बिल पूर्ण फेडा, एकाच वेळी अनेक कर्जे घेणे टाळा आणि credit utilization ३०% च्या आत ठेवा.