EPFO e-Sign Mandatory : एखाद्या कर्मचाऱ्याने ई-नॉमिनेशन ई-साइन केलेले नसेल, तर त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाला किंवा वारसाला पीएफ, पेन्शन (Pension), विम्याचे पैसे मिळण्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात
EPFO e-Sign Mandatory Process : पीएफ (PF) खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक अपडेट समोर आली आहे. अनेक कर्मचारी आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यासाठी (EPF Account) ऑनलाईन ई-नॉमिनेशन (e-Nomination) फॉर्म भरतात आणि आपली प्रक्रिया पूर्ण झाली असे समजून सोडून देतात.
मात्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत तुम्ही आधार ऑथेंटिकेशन वापरून ‘ई-साइन’ (e-Sign) करत नाही, तोपर्यंत तुमची ई-नॉमिनेशनची प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण मानली जाणार नाही.
ई-साइन न केलेले ई-नॉमिनेशन पूर्णपणे अवैध (Invalid) मानले जाते. जर दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याचे ई-नॉमिनेशन ई-साइन केलेले नसेल, तर त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाला किंवा वारसाला पीएफ (PF), पेन्शन (Pension) आणि विम्याचे (Insurance) पैसे मिळण्यात प्रचंड कायदेशीर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक खातेधारकाने ई-साइन करणे बंधनकारक आहे.
EPF Claims Benefit : ई-साइन करण्याचे फायदे
जर पीएफ खात्याचे ई-नॉमिनेशन कायदेशीररित्या पूर्ण आणि ई-साइन केलेले असेल, तर संबंधित कुटुंबाला खालील फायदे सहज मिळतात: Continues below advertisement
- आर्थिक लाभ : कर्मचाऱ्याच्या निधनानंतर नॉमिनीला (वारसाला) खात्यातील जमा रक्कम, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि कर्मचारी ठेव लिंक विमा योजना (EDLI) चे तब्बल 7 लाख रुपयांपर्यंतचे फायदे विनासायास मिळतात.
- ऑनलाईन क्लेम : आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर केवळ एका OTP द्वारे कुटुंबातील सदस्य घरबसल्या ऑनलाईन क्लेम करू शकतात, ज्यामुळे कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज पडत नाही.
तुमच्या पीएफ खात्याची ई-नॉमिनेशन आणि ई-साइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
ई-नॉमिनेशन (e-Nomination) कसे करावे?
- सर्वात आधी EPFO च्या अधिकृत मेंबर पोर्टल वेबसाइटवर unifiedportal-mem.epfindia.gov.in जा आणि तुमचा UAN नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर मुख्य मेन्यूमधील ‘Manage’ या टॅबवर जा आणि तिथे ‘e-Nomination’ या पर्यायावर क्लिक करा.
- पुढील स्क्रीनवर तुम्हाला ‘Having Family’ चा पर्याय दिसेल. तुमचे कुटुंब असल्यास तिथे ‘Yes’ हा पर्याय निवडा.
- आता नॉमिनीचे (वारसाचे) नाव जोडण्यासाठी त्या कौटुंबिक सदस्याचा आधार नंबर, नाव, जन्मतारीख, पत्ता आणि इतर विचारलेली अचूक माहिती भरा.
- त्या सदस्याला पीएफच्या रकमेतील एकूण किती हिस्सा (Share %) द्यायचा आहे ते निश्चित करा. (उदा. एकाच व्यक्तीला पूर्ण अधिकार द्यायचा असल्यास 100% लिहा). सर्व माहिती भरल्यानंतर खाली असलेल्या ‘Save EPF Nomination’ वर क्लिक करा
सर्वात महत्त्वाची प्रक्रिया – ‘ई-साइन’ (e-Sign) कशी करावी?
नॉमिनेशन यशस्वीरीत्या सेव्ह केल्यानंतर खालीलप्रमाणे ई-साइन करणे अनिवार्य आहे:
- पुन्हा ‘e-Nomination’ या विभागात जा, तिथे तुम्हाला स्क्रीनवर ‘e-Sign’ चा एक पर्याय हायलाइट झालेला दिसेल, त्यावर क्लिक करा.
- पुढील पेजवर संबंधित पीएफ खातेधारक सदस्याचा अधिकृत आधार नंबर विचारला जाईल, तो तिथे अचूक प्रविष्ट करा.
- आधार नंबर सबमिट केल्यानंतर, तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नोंदणीकृत (Registered) मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP (वन टाइम पासवर्ड) पाठवला जाईल.
- तो प्राप्त झालेला OTP नियुक्त रकान्यात टाका आणि ‘Verify’ किंवा ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती : युझरने आधार OTP सबमिट करताच स्क्रीनवर ‘Declaration Successfully Signed’ असा संदेश येईल. याचा अर्थ तुमची ई-नॉमिनेशन आणि ई-साइनची प्रक्रिया आता पूर्णपणे यशस्वी झाली आहे. यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.