रस्त्यावर वाहतूक पोलीस नसले तरी आता कॅमेऱ्यांची नजर चुकवणं सोपं राहिलेलं नाही. सिग्नल तोडणं, नो पार्किंगमध्ये गाडी लावणं किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवणं असे प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होतात आणि काही मिनिटांतच मोबाइलवर ई-चालानचा मेसेज येऊन धडकतो.
पण या ऑटोमेटेड सिस्टीममध्ये कधीकधी गडबडही होते. यामुळे अनेकदा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ई-चालान चुकीचे का येऊ शकते, याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- ऑटोमेटेड कॅमेरा सिस्टीममध्ये नंबर प्लेट चुकीची वाचली जाणे.
- दुसऱ्याच गाडीचा फोटो तुमच्या वाहनाच्या नंबरवर मॅच होणे.
- गाडी विकल्यानंतरही जुन्या मालकाच्या नावाने चालान जनरेट होणे.
अशा वेळी घाबरून लगेच पैसे भरण्याची घाई करू नका, कारण चुकीचं चालान ऑनलाइन पद्धतीने रद्द करून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
चालान खरंच चुकीचं आहे का, आधी तपासा
तक्रार करण्याआधी एक पायरी अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे चालान खरोखर तुमच्या नावावर आहे का आणि त्यातली माहिती बरोबर आहे का हे नीट तपासणं. यासाठी echallan.parivahan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा आणि Check Challan Status हा पर्याय निवडा. तिथे वाहन क्रमांक, चालान क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नंबरच्या मदतीने तुमच्या नावावर असलेली सर्व चालानं दिसतात. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी mahatrafficechallan.gov.in हे राज्याचं स्वतंत्र पोर्टलही उपलब्ध आहे, तिथूनही चालानची स्थिती आणि तक्रार नोंदवता येते.
ऑनलाइन तक्रार कशी नोंदवायची
चालानमध्ये खरोखर चूक आढळली, तर पुढील स्टेप्स फॉलो करा:
- पोर्टलच्या मुख्य पानावर Complaint किंवा Grievance हा टॅब दिसतो, त्यावर क्लिक करा.
- तिथे तुमचं नाव, मोबाइल नंबर आणि चालान क्रमांक भरावा लागतो.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी येतो, तो टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
- पुढच्या टप्प्यात चालान चुकीचं का आहे याचं कारण ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडायचं असतं, उदाहरणार्थ चुकीचा वाहन क्रमांक, न घडलेला नियमभंग किंवा गाडी विकल्यानंतरचं चालान. यादीत तुमचं कारण नसेल तर Others निवडून स्वतःच्या शब्दांत स्पष्टीकरण लिहिता येतं.
तक्रार नोंदवताना खालीलपैकी आवश्यक ते पुरावे जोडणे गरजेचे आहे:
- गाडीचा फोटो (ज्यात नंबर प्लेट स्पष्ट दिसेल)
- फास्टॅग (Fastag) ट्रॅव्हल रेकॉर्ड किंवा मेसेज
- पार्किंगची पावती
- गाडी विक्रीचा करार किंवा आरसी ट्रान्सफरची कागदपत्रे
सगळी माहिती भरून सबमिट केल्यावर तुम्हाला एक तक्रार क्रमांक म्हणजे Grievance किंवा e-ticket नंबर मिळतो. हा नंबर जपून ठेवा, कारण याच्याच आधारे पुढे तक्रारीची स्थिती तपासता येते.
तक्रारीची स्थिती कशी तपासायची
तक्रार नोंदवल्यानंतर लगेच निकाल येत नाही. यंत्रणा तुमचे पुरावे आणि चालानची माहिती तपासते, त्यामुळे यासाठी साधारण काही दिवसांपासून काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. यादरम्यान तुम्ही Ticket Status या टॅबमध्ये जाऊन तुमचा तक्रार क्रमांक आणि कॅप्चा टाकून स्थिती पाहू शकता. तक्रार मान्य झाली तर चालान रद्द होतं किंवा दुरुस्त होतं, आणि नाकारली गेली तर संबंधित कारण कळवलं जातं.
तक्रारीचं निवारण न झाल्यास पुढे काय?
पोर्टलवरून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, तर हे प्रकरण व्हर्च्युअल कोर्टाकडे जाऊ शकतं. चालान क्रमांकाच्या आधारे तिथे तुमची बाजू मांडता येते. सर्व आवश्यक कागदपत्रं आणि पुरावे सादर करून मॅजिस्ट्रेटसमोर आपली हरकत नोंदवता येते. तिथून चालान रद्द होणं, दंडाची रक्कम कमी होणं किंवा तशीच कायम राहणं असा निर्णय होऊ शकतो.
तक्रार करताना या गोष्टी लक्षात ठेवा
चुकीचं चालान आलं असेल तर घाईघाईत दंड भरू नका, कारण एकदा पैसे भरले की ती चूक तुमचीच होती असं गृहीत धरलं जातं. तक्रार नोंदवताना तुमच्याकडे ठोस पुरावे असणं गरजेचं आहे, नुसतं तोंडी सांगून चालान रद्द होत नाही. चालानचा मेसेज आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, म्हणजे दहा ते पंधरा दिवसांच्या आतच आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न करा, कारण जितका उशीर होईल तितके पुरावे गोळा करणं आणि प्रकरण निकाली काढणं कठीण होत जातं. तसंच चालान पूर्णपणे दुर्लक्षित करूही नका, कारण न भरलेलं आणि तक्रारही न केलेलं चालान पुढे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअल किंवा आरसी ट्रान्सफरसारख्या कामांत अडचण निर्माण करू शकतं.