PUC Certificate संपलंय? दंड टाळायचा असेल तर घरबसल्या Online Download आणि Renew करण्याची अधिकृत प्रक्रिया जाणून घ्या

How to get PUC certificate online : गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक आणि इन्शुरन्स जितकी महत्त्वाची कागदपत्रं आहेत, तितकंच महत्त्वाचं आहे पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र. अनेक वाहनचालक हे कागदपत्र गांभीर्याने घेत नाहीत आणि नंतर ट्रॅफिक चेकिंगमध्ये किंवा ANPR कॅमेऱ्यांमुळे थेट दंड आकारला जातो. या लेखात पीयूसी म्हणजे नेमकं काय, ते ऑनलाइन कसं तपासायचं, रिन्यू कसं करायचं आणि नसेल तर काय नुकसान होऊ शकतं हे सविस्तर पाहूया.

पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे काय?

पीयूसी म्हणजे तुमच्या गाडीतून बाहेर पडणारा धूर सरकारने ठरवलेल्या प्रदूषण मर्यादेत आहे याचं प्रमाणपत्र. मोटार वाहन कायद्याच्या कलम 190(2) नुसार पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी इंजिन असलेल्या प्रत्येक वाहनाकडे वैध पीयूसी असणं बंधनकारक आहे. फक्त इलेक्ट्रिक वाहनांना यातून सूट आहे, कारण त्यांच्यातून एक्झॉस्ट उत्सर्जनच होत नाही.

पीयूसी टेस्ट पूर्णपणे ऑनलाइन होते का?

हा गैरसमज पुष्कळ जणांना असतो की पीयूसी घरबसल्या मोबाइलवरून काढता येईल. पण तसं होत नाही. गाडीच्या एक्झॉस्ट पाइपला गॅस अ‍ॅनालायझर जोडून प्रत्यक्ष चाचणी करावी लागते, आणि हे काम कोणत्याही अ‍ॅपवरून दूरस्थपणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्यक्ष टेस्टसाठी जवळच्या पेट्रोल पंपावरील किंवा अधिकृत पीयूसी सेंटरवर गाडी न्यावीच लागते.

मात्र टेस्ट झाल्यानंतर तुमचं प्रमाणपत्र puc.parivahan.gov.in या अधिकृत पोर्टलवर आपोआप अपलोड होतं, आणि तिथून तुम्ही स्टेटस तपासणे, डाउनलोड करणे आणि प्रिंट काढणे ही सगळी कामं ऑनलाइन करू शकता.

पीयूसी स्टेटस ऑनलाइन कसं तपासायचं

  • सर्वप्रथम puc.parivahan.gov.in या पोर्टलवर जा आणि PUC Certificate हा पर्याय निवडा.
  • तिथे वाहन नोंदणी क्रमांक आणि चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक टाकून कॅप्चा भरा.
  • यासाठी कुठलाही लॉगिन किंवा ओटीपीची गरज नाही.
  • विचारलेली माहीती सबमिट केल्यावर लगेच तुमच्या गाडीचं पीयूसी वैध आहे की एक्सपायर झालंय, कोणत्या तारखेला टेस्ट झाली आणि एमिशन रीडिंग काय होतं, ही सर्व माहिती स्क्रीनवर दिसते.
  • प्रमाणपत्र वैध असेल तर तिथूनच पीडीएफ डाउनलोड करता येतं.

रिन्यूवलसाठी प्रत्यक्ष काय करावं लागतं?

नवीन गाडी घेतल्यावर तिच्यासोबत मिळणारं पहिलं पीयूसी साधारण एक वर्षासाठी वैध असतं. त्यानंतर मात्र दर काही महिन्यांनी, बहुतांश वाहनांसाठी साधारण सहा महिन्यांनी, पुन्हा टेस्ट करून नवीन प्रमाणपत्र घ्यावं लागतं. वैधता कालावधी वाहनाच्या प्रकारावर आणि राज्यानुसार थोडाफार बदलू शकते, त्यामुळे नक्की मुदत तुमच्या मागच्या प्रमाणपत्रावरच बघून घेणं योग्य ठरतं.

टेस्टसाठी जवळच्या पेट्रोल पंपावरील पीयूसी सेंटर किंवा आरटीओ अधिकृत सेंटरवर जा, तिथे काही मिनिटांतच टेस्ट पूर्ण होते आणि नवीन प्रमाणपत्र मिळतं. फी वाहनाच्या प्रकारानुसार अंदाजे साठ ते सव्वाशे रुपयांच्या दरम्यान असते.

पीयूसी नसेल तर काय नुकसान होतं?

पीयूसी नसताना किंवा एक्सपायर झालेलं असताना पकडलं गेल्यास मोटार वाहन कायद्याच्या कलम 190(2) नुसार पहिल्या वेळी दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, आणि काही राज्यांत तुरुंगवासाची तरतूदही आहे. याशिवाय वैध पीयूसीशिवाय वाहन विमा रिन्यू करता येत नाही किंवा क्लेम प्रोसेसमध्येही अडचण येऊ शकते. काही शहरांमध्ये आता पेट्रोल पंपांवरही पीयूसी तपासलं जातं आणि ते नसेल तर इंधन नाकारलं जाऊ शकतं.

डिजिटल कॉपी पुरेशी आहे का?

होय, डिजिलॉकर किंवा एमपरिवहन अ‍ॅपवर सेव्ह केलेली पीयूसीची डिजिटल कॉपी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तितकीच वैध मानली जाते जितकी छापील प्रत. त्यामुळे गाडीत कागद बाळगण्याऐवजी मोबाइलमध्ये हे प्रमाणपत्र सेव्ह करून ठेवलं तरी पुरेसं आहे.

Leave a Comment