sim card fraud check online in India : गेल्या काही वर्षांत सिम कार्डद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगात जागरुक आणि सतर्क असणे आवश्यक आहे. तुमच्या नावावर जर इतर कोणी सिम कार्ड खरेदी करुन त्याचा वापर करत असेल तर त्याचा पण पत्ता लागतो. त्यासाठी ही एक ट्रिक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.
मोबाईल आणि इंटरनेट आता माणसाची चौथी गरज झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात दिवसागणिक ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात वाढ होत आहे. सहज काही लिंक्स, एसएमएस आणि व्हॉट्सअँपवरुन सहज कोणाला पण गंडा घालण्यात येत आहे.
कधी कधी अशा फसवणूक प्रकरणात कोणाच्या पण नावे सिम कार्ड तयार करण्यात येते, त्याआधारे इतर कोणाला गंडा घालण्यात येतो. त्यामुळे आपल्या नावाचे तर सिम कार्ड वापरुन इतर कोणाची फसवणूक करण्यात येत नाही ना? यासाठी आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. तुमच्या नावे किती सिम कार्ड सुरु आहेत, याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.
पूर्वी कोणत्या व्यक्तीच्या नावे किती सिम कार्ड सुरु आहेत, याची माहिती हाती येणे अवघड होते. पण आता एका व्यक्तीच्या नावे किती सिम कार्ड सुरु आहेत, याची माहिती सहज मिळवता येते. आता केवळ 60 सेकंदात म्हणजे एका मिनिटात तुम्हाला माहिती होईल की तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरु आहेत. कोणी इतर तर तुमच्या सिमकार्डचा वापर करत नाही ना, याची माहिती सहज मिळवता येते.
संचार सारथीची मदत
जर एखादा सायबर गुन्हेगार दुसऱ्याच व्यक्तीचा वापर करुन फसवणूक करत असेल तर अशा प्रकरणात थांगपत्ता लावण्यासाठी केंद्र सरकारने संचार सारथी पोर्टलची सुरुवात केली आहे. त्याच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही सेकंदात तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरु आहेत. त्याचा वापर होत आहे, याची माहिती मिळते. तुम्ही या पोर्टलच्या मदतीने तुमच्या नावावर सुरु असलेल्या पण तुम्ही वापरत नसलेले सिमकार्ड सुद्धा बंद करु शकता.
अशी आहे प्रक्रिया
- सर्वात अगोदर tafcop.sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर जा
- नवीन पेज उघडा, त्याठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाका
- आता पेजवर कॅप्चा कोड नोंदवा
- तुमच्या क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल. तो भरा
- या पोर्टलवर तुमचे लॉगिन झाले असेल
- तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरु आहेत याची माहिती आली असेल
- यामध्ये तुमच्या नावावर वेगळाच मोबाईल क्रमांक दिसत असेल तर तो बंद करता येतो
सिमकार्ड बंद करण्यासाठी
- तुम्हाला जर सिमकार्ड बंद करायचे असेल तर बॉक्समध्ये तुमचे नाव टाका, त्यानंतर खाली रिपोर्ट या बटणावर क्लिक करा.
- रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिसेल. त्यामुळे कुठेतरी संदर्भ क्रमांक लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा किंवा फोटो काढा.
- काही दिवसांनंतर, तुम्ही केलेल्या अहवालाचे तपशील पाहण्यासाठी, पोर्टल किंवा वेब पोर्टलवर लॉगिन करा. म्हणजे स्टेप्स 1प्रमाणे. मग तुम्हाला तुमचा अहवाल, तुम्हाला तुमचा रिपोर्ट ट्रॅक करण्यासाठी तुमचा Ticket ID Ref No. वरती असलेल्या बॉक्समध्ये टाका.
- नंतर तुमच्यासमोर तुमच्या रिपोर्टचा स्टेटस उघडेल.
तर अशाप्रकारे न वापरलेले सिमकार्ड, तुम्ही न घेतलेले सिमकार्ड या पोर्टलच्या माध्यमातून बंद करु शकता. तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे हे सुद्धा कळू शकते.